भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळमध्ये भर रस्त्यावर एका व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी पतीचे नाव रईस खान आहे. रईसची पत्नी त्याच्याकडून घटस्फोट मागत होती, म्हणून त्याने हा जीवघेणा हल्ला केला आहे. पतीचा संशयी स्वभाव आणि रोजच्या मारहाणीला पीडित महिला कंटाळली होती म्हणून तिला घटस्फोट हवा होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सदर घटना सीसीटीव्हमध्ये कैद झाली आहे. एका २२ वर्षीय महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. तिने मदतीसाठी खूप आरडाओरडा केला. स्थानिकांनी खड्ड्यांमध्ये साठलेले पाणी तिच्या अंगावर टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी आपल्या घरातील पाणी घेऊन महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. आरोपी रईस घटना स्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
२०१९ मध्ये झाले होते रईस आणि मुस्कानचे लग्न
राजस्थानमधील अलीगंज छाबरा येथील रईस आणि भोपाळची असलेली मुस्कान यांचा विवाह ४ एप्रिल २०१९ रोजी झाला होता. मात्र आता दोघांच्या नात्यात वाद निर्माण झाले. कोतवालीचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) नागेंद्र पटेरिया यांनी म्हटले की, मुस्कान जेव्हा कुटुंबातील सदस्यांशी फोनवर बोलायची तेव्हा रईस तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारहाणही करायचा. त्यामुळे या जाचाला कंटाळून मुस्कान १८ मार्च २०२२ रोजी भोपाळला परतली आणि आपल्या बहिणीसोबत राहू लागली.
सही करण्याच्या बहाण्याने बोलावले अन...
मुस्कानने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आणि नवीन आयुष्याची सुरूवात करण्यासाठी केयरटेकर म्हणून काम करू लागली. मंगळवारी ती कामावर असता रईसने तिला फोन केला आणि घटस्फोटाची कागदपत्रे मेलद्वारे पाठवली आहेत, असे सांगितले. एसीपी पटेरिया यांच्या माहितीनुसार, तिला जुन्या भोपाळच्या कोतवाली भागात भेटायला बोलावून प्रिंटआउट्स घ्यायला आणि सही करण्यास सांगितले.
माघारी येण्यास नकार दिल्याने लावली आग
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रईस तिची सदर ठिकाणी वाट पाहत होता. त्याने तिचा हात पकडला आणि त्याच्यासोबत परत जाण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागला. मुस्कानने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने त्याने खिश्यातून पेट्रोलची बाटली काढून तिच्यावर पेट्रोल टाकले आणि आग लावली. मुस्कानचा चेहरा आगीने भाजून निघाला तेव्हा त्याने तिथून पळ काढला. ती मदतीसाठी ओरडत होती तेवढ्यात स्थानिक रहिवाश्यांनी तिची मदत केली. त्यांनी आग विझवली आणि उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, रईसचा शोध सुरू आहे, अशी माहिती एसीपी पटेरिया यांनी दिली.