त्र्यंबकेश्वर : बारा वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा जागतिक महोत्सव असून, देश-विदेशातून लोक येत असतात. मागच्या कुंभमेळ्यात त्र्यंबकला १५ लाखापर्यंत भाविक आले होते यावेळेस प्रशासनाने गर्दीत वाढ होईल असे सुतोवाच केले आहे. असे सर्व असतानाही शासन त्र्यंबक नाशिक येथे होणार्या कुंभमेळ्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी केला आहे. ते म्हणाले की, त्र्यंबकसाठी वाढीव निधी मंजुर करण्याकरिता अनेकवेळा पाठपुरावा केला. तथापी शासनाकडून अद्याप काहीच हालचाली नाही साधुंनी ७० ते ७५ शेड्स मागितले होते. निविदा निघाल्या फक्त २० शेड्सच्या पालिकेतर्फे ५० शेड्स मंजुर केल्या आहेत, आठ ठिकाणी कामे सुरू आहेत. दोन आखाड्यांकडे जागाच नसल्याने ते दोन आखाडे वगळून याठिकाणी कामे सुरू आहेत. उर्वरित शेड्सचे काम जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीवर अवलंबून असल्याचे पालिका अभियंता जुन्नरे यांनी सांगितले. टॉयलेटसाठीही काही आखाड्यात जागा नाही. कामांची परिस्थिती धिम्या गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हवे तेवढे लक्ष दिले जात नाही. अर्थात आपुरा निधी त्यात कामांची काटछाट करून त्र्यंबक पालिकेला अवघे ३५ कोटी (३४.६९ कोटी) दिले. अन्य ठिकाणी ७० ते ७५ कोटी दिले जातात. तर मग कुंभमेळा हा जागतिक महोत्सवाची जबाबदारी शासनाची नाही काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हव्यासापायी ठिकठिकाणी वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत, ते स्वत:ला अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष (स्वयंघोषित) मानतात मात्र अखिल भारतीय अखाडा परिषद सन २०१०च्या हरिद्वार कुंभमेळ्यातच बरखास्त झाल्याची आठवण महंत सागरानंदांनी यावेळी करून दिली. त्यामुळे त्यांनी फक्त नाशिकच्या तयारीची काळजी करावी, त्र्यंबकला येऊन लुडबुड करू नये असेही त्यांनी सांगितले. शिखर समितीतील फक्त अधिकार्यांची मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बैठक घेतली. शिखर समितीत साधू-महंत व पालिका मुख्याधिकार्यांचा समावेश असताना कोणतेही निमंत्रण नव्हते याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढील बैठक त्र्यंबकलाच व्हावी!यापुढे होणार्या शिखर समितीची बैठक त्र्यंबकेश्वरलाच घ्यावी अशी आग्रही मागणी त्र्यंबकच्या दहा अखाड्यांनी केला आहे. बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने ही बैठक होणे अनिवार्य आहे. नाशिकचे ३९, त्र्यंबकचे १० अखाडे यामध्ये त्र्यंबकला दहा अखाडे असल्याने बैठक त्र्यंबकलाच होणे औचित्य पूर्ण आहे. यावेळी महंत शंकरानंद सरस्वती उपस्थित होते. त्र्यंबक शहरात आजही खड्यांचे साम्राज्य आहे तीन दिवसांवर निवृत्तीनाथ यात्रा येऊन ठेपली असताना नागरिकांचे हाल होतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
त्र्यंबकेश्वरी कुंभमेळ्यांच्या कामांमध्ये गांभीर्य नाही-सागरानंद सरस्वती
By admin | Published: January 11, 2015 12:17 AM