बराकपूर : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष निवळण्याची लक्षणे नसून उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांकिनारा येथे सोमवारी रात्री गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोन जण ठार व तीन जण जखमी झाले. ते दोघे आमचे कार्यकर्ते असून, त्यांना भाजपच्या गुंडांनी ठार मारल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत हिंसाचारामध्ये ठार झालेल्या दहा जणांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.मृतांमध्ये मोहम्मद मुख्तार व मोहम्मद हलीम यांचा समावेश आहे. या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पश्चिम बंगालचे मंत्री व तृणमूलचे उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे अध्यक्ष ज्योतीप्रिया मलिक यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला मतदान केल्याचा राग मनात ठेवून या दोघांची हत्या करण्यात आली. मात्र, बराकपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असून, त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.मोहम्मद मुख्तारचे कुटुंबीय सोमवारी रात्री घराच्या पडवीत बसलेले असताना त्यांच्यावर काही जणांनी गावठी बॉम्बने हल्ला केला. त्यात मोहम्मद हलीम जागीच मरण पावला, तर मुख्तार रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावला. या हल्ल्यात मुख्तारची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे.>दोघांची हत्याहावडा भागातील सारपोता गावामध्ये सोमवारी भाजपचे कार्यकर्ते समतूल दौली यांचा व अतचाता गावामध्ये रविवारी रा. स्व. संघाचे कार्यकर्ते स्वदेश मन्ना यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. जय श्रीराम अशी घोषणा दिल्यामुळेच तृणमूल काँग्रेसने या दोघांची हत्या केली, असा आरोप भाजपने केला आहे. मन्ना हे गेल्या काही दिवसांपासून जय श्रीरामचा जयघोष करीत होते.
तृणमूल-भाजप यांच्यातील संघर्ष चिघळला, तीन दिवसांत चार हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 8:45 AM