नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय चकमक अद्याप सुरूच आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी केली. टीएमसीकडून डॉ. मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बंगालचे मंत्री सोवनदेब चॅटर्जी यांनी डॉ. मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली.
भारतीय जनता पक्षाकडून डॉ. मुखर्जी यांना हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला ही भूमिका सुट होते. परंतु, सत्य वेगळच आहे. डॉ. मुखर्जी कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी विद्यापीठात इस्लामिक अभ्यासाची स्थापना केली होती. ते बंगालचे सच्चे सुपूत होते. त्यांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. डॉक्टर मुखर्जी आज जिवंत असते तर त्यांना भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती, अशी टीका सोवनदेब चॅटर्जी यांनी केली.
ममता बॅनर्जी सरकारमध्ये डॉ. मुखर्जी यांची पुण्यातिथी अशा वेळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यावेळी राज्यात भाजप मजबूत होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली आहे. येथील ४२ पैकी १८ जागांवर भाजपचा विजय झाला आहे.
याआधी भाजपकडून डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदेश दिले नव्हते, असा आरोप केला आहे. त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करत होता. डॉ. मुखर्जी यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असही भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.