नवी दिल्ली: कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सापडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार आपला फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महुआ यांनी सांगितले की, मला Apple कडून अलर्ट आणि ईमेल मिळाला की सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महुआ मोईत्रा यांनी केला आहे.
सदर प्रकरणावर आता महुआ मोईत्र यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. सध्याच्या भाजपा सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला टार्गेट केले जात आहे. त्यांनी केंद्राचे वर्णन 'पीपिंग टॉम सरकार' असे केले, म्हणजे हे सरकार सर्वत्र डोकावते. महुआ यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत विरोधी खासदार आणि विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचाही वापर केला जात आहे. दळणवळणाच्या साधनांमध्ये बनावट पुरावे पेरले जात असून, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निरपराध नागरिकांना गोवले जात असल्याचे महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे.
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा व्यतिरिक्त, काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेडा आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही त्यांच्या फोनवर अशा अलर्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हा इशारा आप खासदार राघव चढ्ढा, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, सीपीएम सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या फोनवरही आला आहे. दुसरीकडे, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही त्यांच्या फोनवर अलर्ट मिळाल्याचा दावा केला आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली होती. यानंतर ओम बिर्ला यांनी हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवले होते. जय अनंत देहाद्राई यांच्याकडून मिळालेल्या पत्राचा हवाला देत निशिकांत यांनी मोईत्रा यांच्यावर हे आरोप केले आहेत.
निशिकांत दुबे यांचा दावा आहे की, महुआ मोइत्रा यांनी नुकत्याच लोकसभेत विचारलेल्या ६१ प्रश्नांपैकी ५० प्रश्न अदानी प्रकरणावर केंद्रित होते. त्याचवेळी मोईत्रा यांनी या संपूर्ण वादासाठी निशिकांत दुबे आणि त्यांचा मित्र जय अनंत यांना जबाबदार धरले. १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरोप केले की, त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. महुआ मोइत्रा यांच्या याचिकेत न्यायालयाने दुबे, देहाद्राई आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मीडिया हाऊसना त्यांच्या विरोधात कोणतीही खोटी आणि बदनामीकारक माहिती पोस्ट, प्रसारित करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश जारी करावेत अशी मागणी केली आहे. मात्र महुआ यांच्या वकिलांनी या खटल्यातून माघार घेतली.