कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना कराव्या लागल्यानंतर पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्साहाने भाजपमध्ये प्रवेश केलेली नेतेमंडळी, आमदार निवडणूक निकालानंतर पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परत येताना दिसत आहेत. यातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बाबुल सुप्रियो यांचे काही समर्थक आमदार तृणणूल काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे.
बाबुल सुप्रियो यांनी भाजपवर टीका केली असून, पश्चिम बंगालमधील आमदारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट होणारे पाच नाराज आमदार लवकरच भाजपला रामराम करतील, असा दावा बाबुल सुप्रियो यांनी केला आहे. तीन महिन्यांपूर्वी बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पाच पैकी एक आमदार अंबिका रॉय यांनी पुन्हा व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली असून, चुकून ग्रुपमधून बाहेर पडल्याची प्रतिक्रिया रॉय यांनी दिली आहे.
भाजपच्या एकामागून एक विकेट पडतायत
भाजपमधून एकामागून एक विकेट पडत असून, आणखी पाच आमदार बाहेर पडले. शिव बाबू ज्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती, ते कैलासावर निघून गेले आहेत. तर, आणखी पडझडीबाबत माहिती घ्यायची असेल, तर मुरलीधर लेन जेथे भाजपचे प्रदेश कार्यालय आहे, तेथे जावे, असे ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केले आहे. दुसरीकडे, भाजपला सोडचिठ्ठी देणाचा विचार असलेल्या पाच आमदारांमध्ये मुकुटमोनी अधिकारी, सुब्रत ठाकूर, अंबिका रॉय, अशोत कीर्तनिया आणि असीम सरकार यांच्या नावांची चर्चा आहे.
दरम्यान, भाजपने हा दावा फेटाळला असून, या आमदारांना विविध समित्यांवर घेतले जाणार आहे. काहीसा धीर घरावा, सर्व माहिती समोर येईल. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या बाहेर पक्षविस्तार करू पाहत आहेत. लोकांना कामावर ठेवण्यासाठी भरती केली जात आहे. मात्र, ही सगळी दिवास्वप्न आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मुझुमदार यांनी दिली आहे.