नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. शनिवारी त्यांनी नवऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी केली होती. यानंतर श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
नुसरत जहाँ यांना काल कोलकातामधील अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. यामुळे त्या संसदेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकल्या नाहीत. गेल्यावेळी नुसरत यांनी त्यांच्या सडेतोड भाषणामुळे लोकसभा गाजविली होती. तसेच लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच हिंदू तरुणाशी लग्न करत संसदेत हजर झाल्याने चर्चेत आली होती.
इंडिया डॉट कॉम नुसार नुसरत यांना रविवारी कोलकाताच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना आज सोडण्यात येणार आहे. तर मिडीया रिपोर्टनुसार नुसरत यांनी कोणत्यातरी औषधाचा डोस जास्त घेतला होता. यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. नुसरत यांनी शनिवारी पती निखिल जैन याच्या जन्मदिवसाच्या पार्टीमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनुसार नुसरत यांना अस्थम्याचा त्रास आहे. या आधीही त्यांना अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.