केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये मनरेगाचा निधी रोखल्याविरोधात तृणमूल काँग्रेसच्या हजारावर कार्यकर्त्यांनी दिल्लीत आंदोलन केले. यावेळी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना भेटण्यासाठी गेलेल्या तृणमूलच्या शिष्टमंडळाला धक्के मारून बाहेर काढण्याता आल्याचा आरोप तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. तसेच यावरून आता तृणमूल आणि भाजपात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत.
टीएमसीच्या काही खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी कार्यकर्त्यांसोबत धरणे आंदोलन केले. यानंतर ते मंत्री निरंजन ज्योती यांना भेटण्यासाठी जाणार होते. ज्योती यांनी देखील त्यांना वेळ दिली होती. परंतू, ज्योती यांनी आपल्याला तीन तास वाट ताटकळत ठेवले आणि नंतर गुपचूप त्या निघून गेल्याचा आरोप मोईत्रा यांनी केला आहे. तर ज्योती यांनी आपण त्यांची अडीज तास वाट पाहत बसले होते, कोणीच आले नाही असा आरोप केला आहे.
TMC नेते मंगळवारी कृषी भवनात जमले होते आणि त्यांना रात्री बाहेर काढण्यात आले. महुआ यांना महिला पोलिसांनी उचलून बाहेर नेले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि डोला सेन यांच्यासह ४० च्या वर टीएमसी नेते तिथे जमले होते.
टीएमसीचे शिष्टमंडळ सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची भेट घेणार होते. पण, शिष्टमंडळ वेळेवर न आल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री कार्यालयातून निघून गेल्या. अभिषेक बॅनर्जी यांनी त्या आम्हाला भेटल्या नाहीत तर आम्ही येथून हलणार नाही, असा इशारा दिला. यानंतर पोलिसांचा फौजफाटा मोठ्या संख्येने दाखल झाला आणि तृणमूलच्या नेत्यांना कृषी भवनातून बाहेर काढण्यात आले.