नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या सभेत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवरून शाह यांनी केलेल्या टीकेला तृणमूल काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले. आम्हाला उपदेश देण्याऐवजी दिल्ली व्यवस्थित सांभाळा असा सल्ला तृणमूलने अमित शाह यांना दिला.
केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी आम्हाला उपदेशाचे डोस देण्याऐवजी दिल्लीतील हिसेंत निर्दोष लोकांचा जीव वाचवू शकले नसल्यामुळे माफी मागावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे. पश्चिम बंगाल हिंसा आणि द्वेशाशिवाय चांगले असून येथे हिंसा भडकविण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप अभिषेक यांनी केला. अभिषेक यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली.
दिल्लीत नुकत्याच झालेल्या धार्मिक हिंसेत आतापर्यंत 46 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. पुढील वर्षी बंगालमध्ये विधानसभा निवडणूक असून भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अमित शाह येथे आले होते. येथे एकतृतीयांश बहुमताने भाजप जिंकेल असा दावा शाह यांनी केला होता.