कोलकाता : पश्चिम बंगालमधील बिधाननगर, सिलिगुडी, चंदननगर, आसनसोल या चारही महापालिकांच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवून दणदणीत विजय मिळविला आहे. डावे पक्ष, काँग्रेसने नगण्य कामगिरी केली आहे. महापालिका निवडणुकांतील यशाबद्दल तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात जल्लोष केला आहे.
या चारही महापालिकांच्या १२ फेब्रुवारी रोजी निवडणुका झाल्या होत्या. त्यांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. बिधाननगर येथील महापालिकेच्या ४१ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने ३९ जागा जिंकल्या आहेत. भाजप व माकपला शून्यावर समाधान मानावे लागले. काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला आहे, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. चंदननगर येथील महापालिकेत ३२ जागांपैकी ३१ जागांवर तृणमूल काँग्रेसने यश मिळविले आहे. या महापालिकेत माकपने अवघी एक जागा जिंकली.
सिलिगुडीत ४७ पैकी ३७ जागांवर तृणमूल काँग्रेस विजयी झाली. भाजपला पाच जागांवर यश मिळाले. डाव्या पक्षांना फक्त चार व काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. सिलिगुडी महापालिकेच्या निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला ७८.७२ टक्के, भाजप व माकपला अनुक्रमे १०.६४ टक्के व भाजपला ८.५ टक्के मते मिळाली. आसनसोल महापालिकेतील १०६ जागांपैकी ९१ जागा जिंकून तृणमूल काँग्रेस सत्तेवर आला आहे, तर भाजपने सात, काँग्रेसने तीन, डाव्या पक्षांनी दोन व इतरांनी तीन जागांवर विजय मिळविला आहे.
‘मा, माटी, मानुष’मुळेच मिळाला विजय : बॅनर्जी‘मा, माटी, मानुष’ या त्रिसूत्रीमुळेच बिधाननगर, सिलिगुडी, चंदननगर, आसनसोल या चार महापालिका निवडणुकांत तृणमूल काँग्रेसला विजय मिळाला, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे व जनतेचे आभार मानले आहेत.