ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - नारदा स्टिंग ऑपरेशनप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या 13 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुकुल राय, सौगत राय आणि मदन मित्रा यांचाही समावेश आहे. कथित गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचाराचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे.
तृणमूलचे राज्यसभा सदस्य मुकूल रॉय, लोकसभा सदस्य सौगत रॉय, सुलतान अहमद, माजी आमदार मदन मित्रा, कोलकाताचे महापौर सोवन चटर्जी यांच्यासह इक्बाल अहमद, काकोली घोष, प्रसून बॅनर्जी, सुवेंदू अधिकारी, सुब्रत मुखर्जी, फिरहाद हाकीम, अपरूपा पोद्दार आणि आयपीएस अधिकारी सय्यद मोहम्मद हुसेन मिर्झा अशा 13 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधीचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. या स्टिंगची टेप अनेक न्यूज चॅनेल्सना पाठवण्यात आली होती. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे काही नेते लाच घेताना या टेपमध्ये दिसत होते. सीबीआयने प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने यापूर्वी दिला होता.