कोलकाता - देशातील आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून अनेक पक्षांनी संभाव्य उमेदावाऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आता, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी 42 जागांची यादी जाहीर केली. त्यामध्ये 41 टक्के महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तृणमूल काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत 40.5 टक्के महिला उमेदवार देणार असल्याचे ममता यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, मागील काळात दुर्गा पुजेवरून भाजपाकडून सतत ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्यात येत होते. पण, ममता यांनी लोकसभा निवडणुकीत नारी शक्तीला अधिक प्राधान्य देण्याचे ठरवून एकप्रकारे नारी शक्तीला बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅनर्जी यांच्या या निर्णयामुळे एका महिला मुख्यमंत्र्यांची महिलांवरील ममता जगजाहीर झाली आहे. तर, ममता यांच्या या निर्णयाचे देशातील सर्वच महिला वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, एकीकडे अनेक राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीत घराणेशाही जपत आहेत. मात्र, ममता बॅनर्जी यांनी महिला शक्तींला प्राधान्य देण्याचे ठरवल्यामुळे पश्चिम बंगालमधून अधिक महिला उमेदवार निवडणूक लढवताना दिसणार आहेत. तसेच या निर्णयामुळे लोकसभा सभागृहातही महिला खासदारांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढू शकते.
तसेच ममता यांनी लोकसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये मून मून सेन यांना असानसोल या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शताब्दी रॉय यांना बिरभूम मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, लवकरच पश्चिम बंगालीमधील तृणमूलच्या सर्वच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागांवर निवडणूक होणार आहे.