ऑनलाइन लोकमत
कोच्ची, दि. ८ - केरळमधले पिनाराई विजयन सरकार शुक्रवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री टीएम. थॉमस यांनी ६० वर्षावरील तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे. यावर्षीपासून केरळमधील ६० वर्षावरील तृतीयपंथीयांना पेन्शन मिळणार आहे.
केरळमध्ये डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली एलडीएफ सरकार सर्वांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे. त्यात तृतीयपंथीयांचाही समावेश होतो. आम्ही तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजना सुरु करणार आहोत असे थॉमस यांनी सांगितले. विधानसभेतील सदस्यांनी टाळया वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.
केरळमध्ये तृतीयपंथीयांची स्थिती अत्यंत वाईट असून, त्यांना रोजच्या जगण्यासाठी शरीरविक्रीय करावा लागत आहे. यासंबंधीच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर कोची मेट्रो रेल लिमिटेडने पुढे येऊन हाऊसकिपिंग, ग्राहक तक्रार निवारण अशा क्षेत्रांमध्ये त्यांना नोक-यांची संधी दिली. या निर्णयामुळे जवळपास २५ हजार तृतीयपंथीयांना दिलासा मिळाला आहे.