- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी हा जसा हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे तसाच मुस्लिमांमधील ‘ट्रिपल तलाक’च्या प्रथेला धार्मिक श्रद्धेचा आधार आहे. त्यामुळे या प्रथेची न्यायोचितता घटनात्मक मूल्यांच्या निकषांवर तपासली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केला.‘ट्रिपल तलाक’च्या घटनात्मक वैधतेवर सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढील विशेष सुनावणीच्या चौथ्या दिवशी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला.‘ट्रिपल तलाक’ची प्रथा इस्लामविरोधी आहे, हे केंद्र सरकारचे म्हणणे खोडून काढताना सिब्बल म्हणाले की, ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा सन ६३७ पासून रुढ आहे. त्यामुळे तिला इस्लामला अनुसरून नाही, असे म्हणणारे आपण कोण? गेली १,४०० वर्षे मुस्लिम ही प्रथा पाळत आले आहेत. त्यामुळे यात घटनात्मक नितीमत्ता व न्यायोचिततेचा प्रश्नच येत नाही.सिब्बल असेही म्हणाले की, ‘ट्रिपल तलाक’चे मूळ हादिथमध्ये असून प्रेषित मुहम्मदानंतर ती रुढ झाली. रामजन्मभूमीचा संदर्भ देत ते म्हणाले की, प्रभू रामचंद्रांचा जन्म अयोध्येत झाला अशी जर माझी श्रद्धा असेल तर तो श्रद्धचा विषय होतो व मगत्यात घटनात्मक नितीमत्तेचा प्रश्न येत नाही. ‘ट्रिपल तलाक’चेही तसेच आहे. असे असेल तर मग आम्ही यात काहीच करू शकत नाही, असे तुन्हाला म्हणायचे आहे का, असे न्या. रोहिंग्टन नरिमन यांनी विचारल्यावर सिब्बल यांनी त्यास ‘हो नक्कीच’, असे उत्तर दिले.तुम्ही १,४०० वर्षांच्या परंपरेचा दाखला देता, मग त्यात ‘ई-तलाक’सुद्धा येतो का? या न्या. कुरियन जोसेफ यांच्या प्रश्नावर सिब्बल यांनी ‘हली तर लोक व्हॉट््सअॅपरवही तलाक देतात’, असे समर्थन केले.मुस्लिमांमध्ये दोन प्रौढ व्यक्ती राजीखुशीने निकाह करून लग्नबंधनाचा करार करतात. तसाच तलाक हाही दोघांमधील करार आहे. विवाह व घटस्फोट हे दोन्ही जर राजीखुशीने होणारे करार असतील तर इतरांचा त्याला आक्षेप असण्याचे कारण काय?-अॅड. कपिल सिब्बल, मुस्लिम कायदा मंडळाचे वकील