नवी दिल्ली, दि. 22 - बहुचर्चित तिहेरी तलाक प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आणि तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली. तसंच केंद्र सरकारला सहा महिन्यात यासंबंधी कायदा बनवण्याचा आदेश दिला. पण भारताआधीच जगभरात अनेक देशांमध्ये ट्रिपल तलाकवर बंदी आहे. भारताचा शेजारी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही ट्रिपल तलाकवर बंदी आहे.
पाकिस्तानमध्ये 1961 मध्येच तीन तलाकवर बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानसह बांगलादेश, सीरिया यांसारख्या अनेक मुस्लिम देशांचाही समावेश आहे. ट्रिपल तलाकवर बंदी घालणारा इजिप्त हा जगातील पहिला देश होता. येथे 1929 मध्येच येथे ट्रिपल तलाकला घटनाविरोधी ठरवून बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 1929 मध्येच सूडान या देशाने इजिप्तचं अनुकरण केलं.
या देशांमध्ये बॅन आहे ट्रिपल तलाक - पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, तुर्की, सायप्रस, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया, अल्जेरिया, इराण, इराक, मेलिशाया, ब्रुनेई, युएई, इंडोनेशिया, मोरक्को, कतर, सूडान.
तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया- - ट्रिपल तलाक म्हणजेच तिहेरी तलाक. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो. - या पद्धतीमध्ये पुरुष तीनवेळा तलाक शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो, फक्त या शब्दाच्या तीनदा उच्चारणाने घटस्फोट मिळतो. - वास्तविक तलाक शब्दाच्या उच्चारणानंतर पुर्नविचार करण्यासाठी वेळ देणं अपेक्षीत आहे, मात्र बहुतांशवेळेस एकाच बैठकीत तीनवेळा तलाक म्हटलं जातं. - तिहेरी तलाक लिखित किंवा तोंडी स्वरुपात दिली जातो.- आधुनिक काळात फोन, एसएमएस, इ-मेल, सोशल मीडियाचाही वापर केल्याची उदाहरणे आहेत. - तलाक मिळालेल्या पतीशी पुन्हा विवाह करायचा असेल तर पत्नीला आधी दुसरया पुरुषाशी विवाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हटले जाते. मगच पहिल्या पतीशी पुन्हा विवाह करता येतो .- भारतीय मुस्लिमांचे सर्व धार्मिक, विवाह कौटुंबिक व्यवहार मुस्लीम पर्सनल लाँ ( शरियत) अँप्लिकेशन अँक्ट १९३७ च्या अंतर्गत येतात.
- तिहेरी तलाकला तलाक -ए- मुघलझा असेही म्हटले जाते. - तिहेरी तलाक सहजगत्या वापरला जाऊन महिलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून या प्रथेला विरोध होत आहे. - काही धर्मगुरुंनी या प्रथेत बदल म्हणजे धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केल्यासारखे होईल असे स्पष्टीकरण देत प्रथेला पाठिंबा दिला.
काय आहे नेमके प्रकरण?मार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं. मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं.त्यानंतर आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला.
तिहेरी तलाकविरोधातील याचिकासात याचिकाकर्त्या महिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तिहेरी तलाक रद्द करण्याची मागणी केली होती. मुस्लिम महिला आंदोलन, मुस्लिम वीमेन पर्सनल लॉ बोर्ड, लॉयर्स कलेक्टिव या संघटनांनीही तिहेरी तलाक रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. तिहेरी तलाकमुळे पुरूषांना लग्न मोडण्याचा एकतर्फी हक्क मिळतो. हे घटनेने देशातील नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते. गेल्या ७० वर्षांपासून आपण या सापळ्यात अडकलो आहोत. त्यामुळे धर्म आणि घटना या दोन्हींना धक्का लागणार नाही, असा कायदा बनवण्याची गरज पक्षकारांकडून व्यक्त करण्यात आली होती.