तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर; काँग्रेसचा सभात्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 06:53 PM2019-07-25T18:53:55+5:302019-07-25T19:18:47+5:30
तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजूनं ३०३ मतं
नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूनं ३०३ खासदारांनी मतदान केलं. तर ८२ खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केलं. यावेळी काँग्रेस, तृणमूल आणि जदयूचे खासदार सभागृहातून बाहेर पडले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत दोनवेळा मंजूर झालं होतं. मात्र राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यानं हे विधेयक संमत होऊ शकलं नाही.
आज तिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा झाली. सरकारच्या वतीनं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयकावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मोहम्मद पैगंबरांचा संदर्भ दिला. 'तिहेरी तलाक अयोग्य असल्याचं पैगंबरांचं मत होतं. मग असदुद्दीन ओवेसींनी तिहेरी तलाकमुळे त्रासलेल्या महिलांच्या बाजूनं उभं राहायला हवं,' असं आवाहन प्रसाद यांनी केलं. पैगंबरांच्या एका अनुयायानं पत्नीला तिहेरी तलाक दिला होता. त्यावेळी ते खूप नाराज झाले होते, असं प्रसाद यांनी म्हटलं.
JDU, TMC and Congress MPs had staged walkout from the Lok Sabha in protest against the #TripleTalaqBillhttps://t.co/0x4HnFRIz2
— ANI (@ANI) July 25, 2019
तिहेरी तलाक विधेयकावरुन एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी सरकारला लक्ष्य केलं. या विधेयकात तलाक देणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांची शिक्षा आणि दंडांची तरतूद आहे. शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात असलेला पती आपल्या पत्नीला पैसे कसे काय देणार? असा प्रश्न औवेसी यांनी विचारला आहे. सरकारकडून लग्न प्रथाच नष्ट करण्यात येत आहे. महिलेला रस्त्यावर आणि तिच्या पतीला तुरुंगात टाकत आहे. मुस्लीमांच्या त्यांच्या सभ्यता आणि शिष्टाचारापासून दूर करण्याचा हा डाव आहे, अशा शब्दांत ओवेसींनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी आणि खासदार शशी थरुर यांनीदेखील तिहेरी तलाक विधेयकाला विरोध दर्शवला. 'सर्वोच्च न्यायालयानं तीन तलाकचं गुन्हेगारीकरण करण्यास सांगितलेलं नाही. आमचा याच गोष्टीला विरोध आहे,' असं चौधरी म्हणाले. तर केवळ एका समुदायाच्या महिलांसाठीच कायदा का आणला जात आहे, इतर समुदायांसाठी असा कायदा का नाही, असे प्रश्न थरुर यांनी उपस्थित केले.