नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूनं ३०३ खासदारांनी मतदान केलं. तर ८२ खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केलं. यावेळी काँग्रेस, तृणमूल आणि जदयूचे खासदार सभागृहातून बाहेर पडले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत दोनवेळा मंजूर झालं होतं. मात्र राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यानं हे विधेयक संमत होऊ शकलं नाही. आज तिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा झाली. सरकारच्या वतीनं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयकावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मोहम्मद पैगंबरांचा संदर्भ दिला. 'तिहेरी तलाक अयोग्य असल्याचं पैगंबरांचं मत होतं. मग असदुद्दीन ओवेसींनी तिहेरी तलाकमुळे त्रासलेल्या महिलांच्या बाजूनं उभं राहायला हवं,' असं आवाहन प्रसाद यांनी केलं. पैगंबरांच्या एका अनुयायानं पत्नीला तिहेरी तलाक दिला होता. त्यावेळी ते खूप नाराज झाले होते, असं प्रसाद यांनी म्हटलं.
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर; काँग्रेसचा सभात्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 6:53 PM