नवी दिल्ली: केंद्र सरकारनं तिहेरी तलाकविरोधी कायदा केल्यानंतरही देशात तिहेरी तलाकच्या घटना घडत आहेत. संसद भवनापासून १५ किलोमीचर अंतरावर असलेल्या दिल्लीतल्या कबीर नगरमध्ये एका महिलेला तिच्या पतीनं तलाकला दिला आहे. निकाहानंतर महिलेला तिचा पती हुंड्यासाठी मारहाण करत होता. मूल होत नसल्यानंदेखील पतीकडून मारहाण झाल्याची माहिती पीडितेची आई समरजहा यांनी दिली.२७ मे २०१६ रोजी समरजहा यांची मुलगी गुलनाजचा निकाह सलमानसोबत झाला. निकाहानंतर सलमान गुलनाजला मारहाण करू लागला. चारित्र्यावर शंका घेत त्यानं ३ दिवस बंद खोलीत गुलनाजला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला समरजहा यांच्या समोर तिहेरी तलाक दिला. यानंतर समरजहा यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं. मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं.गुलनाजचं कुटुंब तक्रार दाखल करण्यासाठी १३ डिसेंबरला रात्री ९ वाजता गोकुलपुरी पोलीस ठाण्यात पोहोचलं होतं. मात्र रात्री २ पर्यंत पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. मात्र सलमान विरोधात फारशी गंभीर कलमं लावली नाहीत. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यातूनच जामीन मिळाला. त्यानंतर गुलनाजच्या कुटुंबीयांनी पोलीस उपायुक्तांकडे गाऱ्हाणं मांडलं. त्यानंतर सलमान विरुद्ध दाखल असलेल्या एफआयआरमध्ये काही गंभीर कलमांची नोंद करण्यात आली.मुस्लिम महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही चांगले निर्णय घेतले आहेत. सकारात्मक पावलं उचलली आहेत, असं समरजहा म्हणाल्या. पंतप्रधानांनी तिहेरी तलाक विरुद्ध कायदा आणूनही न्याय मिळत नाही. पोलिसांनी पंतप्रधानांचं ऐकून काही तरी ठोस कारवाई करायला हवी, अशी अपेक्षा समरजहा यांनी व्यक्त केली.
बेदम मारहाण करून पत्नीला दिला ट्रिपल तलाक; मदतीसाठी कुटुंबीयांची पंतप्रधानांना साद
By कुणाल गवाणकर | Published: December 24, 2020 10:43 AM