ईशान्य भारतातील तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यापैकी भाजपाची सत्ता असलेल्या त्रिपुरामध्येभाजपाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. त्रिपुरामध्ये गेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाचे बहुमत हुकणार असल्याचे चित्र सुरुवातीच्या कलांमधून दिसत आहे. सध्या समोर येत असलेल्या कलांमध्ये भाजपा २८ तर डावी आघाडी १८ आणि स्थानिक टीएमपी १३ जागांवर आघाडीवर आहे.
२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने डाव्या पक्षांची अनेक वर्षांपासूनची सत्ता उलथवून स्पष्ट बहुमत मिळवले होते. यावेळच्य़ा निवडणुकीतही भाजपा स्पष्ट बहुमत मिळवेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीला मोठी आघाडी मिळवणारा भाजपा उत्तरोत्तर पिछाडीवर पडताना दिसत आहे. प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या स्थानिक टीएमपीने भाजपाचे गणित बिघडवल्याचे चित्र आहे. त्यामुळे ६० सदस्य असलेल्या त्रिपुरा विधानसभेत भाजपा मोठा पक्ष ठरला तरी त्याला बहुमत मिळणार का याबाबत शंका निर्माण झाली आहे.
सध्याच्या कलांमध्ये भाजपा २८, डावी आघाडी १८ आणि टीएमपी १३ जागांवर आघाडीवर आहे. तर निवडणूक आयोगाच्या कलांनुसार ४६ जागांचे कल समोर आले आहेत. त्यात भाजपा १८, डावे पक्ष ९. टीएमपी १२, काँग्रेस ५ आणि इतर २ जागांवर आघाडीवर आहेत.