आगरतळा - त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. त्रिपुरा या सुदूर राज्यामध्येही भाजपाने सत्ता मिळवत ईशान्य भारतामध्ये दमदार आघाडी घेतली आहे. त्रिपुरामधील ६० जागांपैकी ५९ जागांवर निवडणूक झाली होती. त्यातील ४१ जागांवर आघाडी घेत भाजपाने डावे आणि काँग्रेसचा मोठा पराभव केला आहे. गेल्या निवडणुकीत माकपाला ३९ जागा मिळाल्या होत्या पण आता डाव्यांना केवळ १८ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर गेल्या विधानसभेत १० आमदार असणाऱ्या काँग्रेसचा नव्या विधानसभेत एकही आमदार नसेल.
पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा हे डाव्यांचे गड मानले जायचे. या राज्यांमधून त्यांची सत्ता सहजासहजी संपवणे शक्य नाही असे म्हटले जायचे. परंतु पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी डाव्यांना सत्तेतून बाहेर करत दोनदा मुख्यमंत्रीपद मिळवले आणि आता भाजपाने त्रिपुरामध्ये विजय मिळवला आहे.
गेली २५ वर्षे त्रिपुरात तळ ठोकून बसलेल्या डाव्यांच्या गढीला धक्का देण्याची कल्पना भाजपाच्या नेतृत्वाने मांडली आणि तसा पद्धतशीर आराखडाही तयार केला. भाजपाचे सुनील देवधर हे गेली चार ते पाच वर्षे या राज्यात तळ ठोकून आहेत. ज्या राज्यात एकही जागा गेल्या विधानसभेत जिंकता आली नव्हती आणि जेथे डाव्यांचा अभेद्य किल्ला होता अशा ठिकाणी भाजपाने पाय रोवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू केले. मात्र काँग्रेसने डाव्यांना विरोध करण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम राबविला नाही. भाजपाने सुनील देवधर, पक्षाचे सरचिटणीस राम माधव, आसासममधील महत्त्वाचे नेते हेमंत बिस्वा सर्मा आणि केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथानम यांच्यासारखी नेत्यांची फळी निर्माण केली. त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालयातील प्रत्येक प्रदेशात जाऊन प्रचार करत जनमत उभे केले.
डाव्यांना विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे ६० जागांच्या विधानसभेत १० आमदार होते तरीही काँग्रेसने डाव्यांना पर्याय म्हणून उभे राहण्यासाठी फारसे काही केले नाही. यामुळे निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा भाजपाने मात्र घेतला. होय, डाव्यांचं सरकार उलथवता येऊ शकतं, असं सांगत रस्त्यावर उतरुन जनमत आपल्या बाजूने आणण्यासाठी भाजपा कार्यरत राहिला. भाजपाने शून्यातून येऊन एवढी मोठी झेप घेणे आश्चर्य वाटायला लावणारी आहेच. दुसरीकडे काँग्रेस मात्र आपण स्पर्धेतच नाही, ही निवडणूक जणू माकपा आणि भाजपा यांच्यामध्ये सुरू असल्याच्या थाटात शांत राहिली. डाव्यांच्या विरोधात जनमत तयार करण्यात किंवा त्याचे मतांमध्ये रुपांतर करण्यात काँग्रेसने हालचाल केली नाही. त्याचाच परिणाम आता मतमोजणीत दिसत आहे. एकेकाळी त्रिपुरामध्ये सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष माकपाच्या पंचविस वर्षात प्रभावहीन झाला होता पण निवडणुकीच्या निमित्ताने आव्हान देण्याची संधी या पक्षाने घालवली असे वाटते. काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलेल्या शहजाद पुनावाला यांनी काँग्रेसच्या पराभवाच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ईशान्य भारतापेक्षा राहुल गांधींना इटलीला जाणं महत्त्वाचं वाटतंय असा टोला त्यांनी लगावला आहे.