नवी दिल्ली - त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. देब यांनी केलेल्या एका विधानामुळे ते पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस अर्थात 1 मे रोजी दिली जाणारी कामगार दिनाची सुट्टी देब यांनी आता बंद करण्याची घोषणा केली आहे. 'सरकारी कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सुट्टीची आवश्यकता नाही. कारण 'सरकारी कर्मचारी हे कामगार किंवा श्रमिक नाहीत' असंही बिप्लब देब म्हणाले.
देब यांनी वरिष्ठ नोकरदारांना विचारले की, आपण कामगार आहात का?…नाही, मी एक कामगार आहे का?…नाही मी मुख्यमंत्री आहे. आपण मंत्रालयामध्ये जनतेच्या कामांच्या फाइल्सवर काम करतो, औद्योगिक क्षेत्रात नाही. मग तुम्हाला या सुट्टीची गरजच काय? 1 मे हा दिवस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नसून कामगारांसाठी असतो असं म्हटलं आहे. त्यामुळेच त्रिपुरातील भाजपा-स्वदेशी पीपुल्स फ्रन्ट (आयपीएफटी) सरकारने कामगार दिवस हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमधून आता वगळला आहे.
त्रिपुरामध्ये पहिल्यांदा आंतराराष्ट्रीय कामगार दिन अर्थात 1 मे हा दिवस वाम मोर्चा सरकारच्या काळात सुट्ट्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला होता. 1978मध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री नृपण चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखील सुट्टी मिळाली होती. मात्र आता बिप्लब देब सरकारने ती बंद केल्याची घोषणा केली आहे. देशात केवळ काही मोजकीच राज्ये अशी आहेत की, तिथे 1 मे रोजी सुट्टी असते.