गुवाहाटी: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्यावर नाराज आहेत. मोदींनी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर टीका केली होती. त्रिपुराला माणिक नव्हे, तर हिऱ्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. मतदारांनी भाजपच्या बाजूनं कौल दिल्यानं माणिक सरकार पायउतार झाले आणि भाजपानं बिप्लब देब यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. मात्र मोदींनी त्रिपुराला दिलेला हिरा, अर्थात बिप्लब देब, मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. त्यामुळे भाजपा वारंवार अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळेच मोदींनी देब यांना समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांनी बिप्लब देब यांनी 2 मे रोजी दिल्लीत बोलावलंय. मोदी आणि शाह यांच्याकडून देब यांना थेट समज दिली जाणाराय. 'देब यांच्या विधानांमुळे पक्षातील वरिष्ठ नेते नाराज आहेत. देब तोंडाला येईल ते बोलत सुटले आहेत. त्यामुळे स्वत: मोदी त्यांच्याशी बोलून त्यांना योग्य ती समज देतील,' अशी माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यांनं दिली. काही दिवसांपूर्वीच मोदी यांनी पक्षातील नेत्यांना वादग्रस्त विधानं टाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. 'वादग्रस्त वक्तव्य माध्यमांना मसाला देऊ नका,' असा आदेश मोदींनी दिला होता. मात्र यानंतरही देब यांच्याकडून वादग्रस्त विधानं सुरूच आहेत.देब यांनी गेल्या महिन्यात त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. मात्र यानंतर ते कायमच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले. 'महाभारत काळात इंटरनेट आणि सॅटेलाईट होतं,' असं वादग्रस्त विधान केल्यानं देब यांच्यावर चौफेर टीका झाली होती. हा वाद संपायच्या आधीच देब यांनी मिस वर्ल्ड डायना हेडनबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. डायना हेडनला 21 वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मिस वर्ल्डच्या विजेतेपदावर बिप्लब देव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. विविध स्तरांवर आयोजित होणाऱ्या सौंदर्य स्पर्धा या बोगस असून, हेडन हिला खिताब देण्याची प्रक्रिया समजली नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. डायना मिस वर्ल्ड बनली, हे ठीक आहे, पण डायना हेडनचं सौंदर्य मला समजलेलं नाही', असं देब यांनी म्हटलं होतं. यानंतर देब यांनी तरुणांनी पान टपरी करण्याचा सल्ला देऊन नवा वाद ओढवून घेतला. 'सरकारी नोकऱ्यांसाठी वर्षानुवर्षे राजकीय पक्षांच्या मागे फिरुन वेळ वाया घालवण्यापेक्षा तरुणांनी पान टपरी सुरू करावी,' असं देब यांनी म्हटलं. तरुणांनी स्वत:चा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करावा, असं देब यांनी सांगितलं. 'तरुणांनी स्वयंरोजगार मिळवावा. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज घ्यावं. पान टपरी सुरू करण्यासोबतच पशुपालन क्षेत्रातही तरुणांना व्यवसायाची संधी आहे. दुग्धोत्पादन क्षेत्रातही तरुणांना चांगला वाव आहे,' असं देब म्हणाले. त्रिपुरा पशुवैद्यकीय परिषदेनं आयोजित केलेल्या एका शिबिरात ते बोलत होते. 'कोणत्याही तरुणानं बँकेकडून किमान 75 हजार रुपयांचं कर्ज घेतलं, तरी तो महिन्याला किमान 25 हजार रुपये कमावू शकतो,' असंही देब यांनी म्हटलं होतं.
मोदी 'हिऱ्या'ला दाखवणार हिसका; बिप्लब देब यांना वादग्रस्त विधानं भोवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 8:40 AM