नवी दिल्ली - काँग्रेस भवनासमोर काँग्रेस आणि भाजपा समर्थकांमध्ये तुफान राडा झाला आहे. यामध्ये त्रिपुरा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (TPCC) प्रमुख बिरजीत सिन्हा यांच्यासह जवळपास 19 जण जखमी झाले. राज्यातील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. विशेष म्हणजे त्रिपुरातील विधानसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला तीन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली आहे.
काँग्रेस नेते आशिष कुमार साहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आगरतळा विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार सुदीप रॉय बर्मन यांच्यासह काँग्रेस समर्थक दुपारी 1 वाजता मतमोजणी केंद्रातून काँग्रेस भवनात परतले. आम्ही जेवणाची तयारी करत असताना भाजपा समर्थकांच्या एका गटाने काँग्रेस भवनावर हल्ला केला. त्रिपुरा प्रदेश काँग्रेस कमिटी (TPCC) अध्यक्षांच्या डोक्यावर विटांनी वार करण्यात आले, तर आणखी एक काँग्रेस कार्यकर्ता रोमी मियाँ यांना भाजप समर्थकांनी चाकून भोसकले."
युवा मोर्चाच्या नेत्याच्या नेतृत्वाखालील भाजपा समर्थकांनी इमारतीवर दगडफेक केली आणि बाहेर उभ्या असलेल्या अनेक मोटारसायकलचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, माहिती आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुशांत चौधरी यांनी आदल्या दिवशी आगरतळा महानगरपालिकेचे (एएमसी) भाजपा नगरसेवक शिल्पी सेन यांच्यावर काँग्रेस समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आणि त्या घटनेमुळे कार्यकर्ते संतप्त झाले. काँग्रेसने केलेल्या हल्ल्यात आमच्या पक्षाचे सहा कार्यकर्ते जखमी झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टीपीसीसी अध्यक्षांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाकूहल्ला झालेल्या काँग्रेस समर्थकावरही उपचार सुरू आहेत. विशाल चक्रवर्ती या भाजपा समर्थकाच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना 12 टाके लागले आहेत. रॉय बर्मन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पश्चिम त्रिपुरा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेबाबत निवेदन सादर केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.