अगरतळा : त्रिपुरातील सिपाहिजाला जिल्ह्यात सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष टिपरा मोथा यांच्यात सोमवारी हिंसक संघर्ष झाला. यादरम्यान एक पोलीस अधिकारी आणि अन्य दोन कर्मचार्यांसह जवळपास १२ जण जखमी आहे. यासंदर्भात मंगळवारी पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी मोठी विजयी रॅली काढली. या रॅलीदरम्यान टिपरा मोथा आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना आदिवासीबहुल जम्पुईजाला भागात घडली आहे.
सहाय्यक महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) ज्योतिषमन दास चौधरी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, "टिपरा मोथा कार्यकर्त्यांच्या एका गटाने कथितरित्या काही भाजप कार्यकर्त्यांना रॅलीत सामील होण्यापासून रोखल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली."
दरम्यान, या हाणामारीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह जवळपास १२ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.