अगरतळा- त्रिपुरात भाजपाला मिळालेला विजय हा ऐतिहासिक आहे. देशाच्या राजकीय इतिहासात या विजयाची खास नोंद घेतली जाईल. त्रिपुराचा विजय कधीही विस्मृतीत जाणार नाही. आमच्या नव्या सरकारमधील नवे चेहरे त्रिपुराला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी त्रिपुरामध्ये भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. मोदींच्या उपस्थितीत विप्लबकुमार देव यांनी त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधीत केलं.
त्रिपुरामध्ये पुन्हा दिवाळीसारखं वातावरण आहे. ज्यांनी भाजपाला मत दिलं नाही, हे त्यांचंही सरकार आहे. जे विरोधीपक्षात निवडून आले त्यांच्याकडे अनुभव आहे. जे सत्तेवर निवडणून आले त्यांच्याकडे उत्साह आहे. दोघांनी मिळून कामं करा, असंही नरेंद्र मोदींनी म्हंटलं. त्रिपुराची ही निवडणूक बोटावर मोजता येणाऱ्या निवडक निवडणुकांपैकी एक आहे ज्याची इतिहासाच चर्चा होईल व विश्लेषण केलं जाईल. भारताच्या राजकारणात अगदी थोड्या निवडणुका आहेत. ज्यांची दिर्घ काळासाठी चर्चा झाली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराजा विक्रम सिंह यांचीही आठवण काढली. त्रिपुराचा प्रत्येक नागरिक आमचा आहे. सत्तेतील व विरोधीपक्षातील सगळेच आमदार एकत्र मिळून त्रिपुराच्या विकासासाठी काम करतील, असा मला विश्वास आहे. ज्यांनी आम्हाला मत दिलं त्यांच्यासाठी हे सरकार आहेच पण ज्यांनी मत दिलं नाही, हे सरकार त्यांच्यासाठीही असल्याचं मोदी म्हणाले.