पूर्वोतरेकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी नुकतेच मतदान झाले असून, आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. दरम्यान, या तिन्ही राज्यातील मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यातील त्रिपुरा राज्याच्या एक्झिट पोलकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यात काही एक्झिट पोलमधून त्रिपुरामध्ये भाजपाला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर एका एक्झिट पोलमधून भाजपा बहुमतापासून दूर राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांच्या मनातील धाकधूक वाढली आहे.
टाइम्स नाऊ-इटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलमधून त्रिपुरामध्ये भाजपाला बहुमत हुलकावणी देईल, अशी शक्यता वर्तवली आहे. या एक्झिट पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपाला २१ते २७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर डावे आणि काँग्रेसच्या आघाडीला १८ ते २४ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र त्रिपुरामध्ये काँग्रेसचे खातेही उघडणार नाही, असा दावाही या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे स्थानिक टीएमपीला ११ ते १७ जागा मिळतील, असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, इतर एक्झिट पोलचा विचार केल्यास इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये त्रिपुरात भाजपा आघाडीला ३६ ते ४५ जागा देण्यात आल्या आहेत. तर डाव्या आघाडीला ६ ते ११ आणि टीएमपीला ९ ते १६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मॅटरिझ-झी न्यूजने त्रिपुरामध्ये भाजपा आघाडीला २९ ते ३६, डाव्या आघाडीला १३ ते २१ जागा, टीएमपीला ११ ते १६ आणि इतरांना ०-३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने डाव्या पक्षांची अनेक वर्षांपूर्वीपासूनची सत्ता उलथवून लावत बहुमतासह विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत डावे पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. तसेच स्थानिक टीएमपी (तीरा मोथा पार्टी) या पक्षानेही भाजपासमोरील आव्हान वाढवले आहे. त्यामुळे यावेळी त्रिपुराची जनता काय कौल देते याबाबत उत्सुकता आहे.