पूर्वोत्तर भारतातील त्रिपुरामधीलशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये एड्सचा फैलाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिपुरा राज्य एड्स नियंत्र सोयायटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये एचआयव्हीमुळे ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८२८ विद्यार्थ्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. TSSES च्या संयुक्त संचालकांनी सांगितले की, राज्यातील शाळांमधीलविद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचं सेवन करत आहेत.
एचआयव्हीच्या या आकड्यांबाबत TSSES च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यंत ८२८ विद्यार्थ्यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून नोंदणी केली आहे. त्यामधील ५७२ विद्यार्थी अजूनही संसर्गग्रस्त आहेत. तर संसर्गामुळे ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी त्रिपुराच्या बाहेर गेले आहेत. त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीने २२० शाळा आणि २४ कॉलेज आणि विश्वविद्यालयांमधील इंजेक्शनमधून औषघे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवली आहे. यामधील एखाद्या एचआयव्हीग्रस्त विद्यार्थ्याने वापरलेलं इंजेक्शन अन्य विद्यार्थ्याने वापरल्यास त्यालाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धक्कादायक बाब म्हणजे दररोज एचआयव्हीचे पाच ते सात रुग्ण सापडत आहेत. आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये एचआयव्ही पीडित लोकांची संख्या ५ हजार ६७४ एवढी आहे. त्यामध्ये ४ हजार ५७० पुरुष आणि ११०३ महिला आहेत. त्यामधील केवळ एक रुग्ण ट्रान्स जेंडर आहे.