बेंगळुरू : देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. केंद्र सरकार आपल्या स्तरावर मोठी योजना तयार करत आहे. एका लसीकरण केंद्रावर ५ कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच लस टोचल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. यासाठी वेगळी खोली तयार केली जाणार आहे.
केंद्र सरकारने राज्यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा ड्राफ्ट पाठविला आहे. यामध्ये लसीकरणाबाबत करावयाची तयारी नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर एका दिवसात १०० लोकांना लस टोचली जाणार आहे. यानंतर वेग वाढविण्यासाठी समाज भवन, टेंट आदी लावण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी लसीकरण केंद्रांना मोठ्या जागेची आवश्यकता भासणार आहे.
आरोग्य आणि कुटुं कल्याण मंत्रालयाला ही माहिती देण्यात आली आहे. या एसओपीनुसार लसीकरण केंद्रावर एक गार्डसह ५ लोकांची तैनाती केली जाणार आहे. ३ खोल्या वेटिंग, लसीकरण आणि निरिक्षणासाठी उभारल्या जाणार आहेत.
लस टोचून घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणताही दुष्परिणाम दिसून येतो का हे पाहण्यासाठी ३० मिनिटे निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. गंभीर परिस्थिती असल्यास त्याला करार केलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल. केंद्राच्या एका दिवसाच्या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या आरोग्य अधिकारी डॉ. रजनी एन यांनी सांगितले की, लसीकरणासाठी तीन खोल्यांच्या उभारणीचा निर्णय हा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी घेण्यात आला आहे.
एका व्यक्तीलाच प्रवेशलसीकरणासाठी खोलीमध्ये एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे. वेटिंग आणि निरिक्षणाच्या खोलीत काही लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाईल. काही देशांमध्ये वेगवेगळ्या कोरोना लसीला आपत्कालीन लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. भारतातही तीन कंपन्यांनी लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यामध्ये प्रामुख्याने फायझर, सिरम आणि भारत बायोटेकच्या लसींचा समावेश आहे.
नवीन वर्षात कोरोना लस येण्याचे संकेत आहे. त्यानुसार शासन, प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन चालविले आहे. मतदानाप्रमाणे बूथ तयार करण्यात येणार असून, तेथे काेरोनाची लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तींचा मोबाईलवर संदेश येईल आणि क्यू.आर.कोड असलेले प्रमाणपत्र पाठविले जाणारआहे. त्याकरिता जिल्हास्तरावर ‘टास्क फोर्स’चे गठन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे.