मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रिया चक्रवर्तीवर देखील भाष्य केलं आहे. थेट रियाची 'औकात' काढली आहे. त्यानंतर, सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलण्याची रिया चक्रवर्तीची 'औकात' नाही असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे. तसेच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज हे यश मिळालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. यासोबतच न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण प्रचंड आनंदी असल्याचं सांगत हा 130 कोटी जनतेच्या भावनांचा विजय असल्याचंही ते म्हणाले आहेत. रिया चक्रवर्तींची औकात असे म्हटल्यामुळे सोशल मीडियातून डीजीपी पांडे ट्रोल होत आहेत. पोलीस महासंचालक पदाच्या व्यक्तीने एखाद्या नागरिकाबद्दल असे शब्द वापरणे चुकीचे आहे. डीजीपींच्या पदाला आणि प्रतिष्ठेला हे शोभत नाही, असे म्हणत नेटीझन्सने पांडे यांच्यावर टीका केलीय.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांबद्दल एखाद्या आरोपीने विना पुरावा कुठलिही टीका करणे योग्य नाही. एखाद्या राजकीय नेत्याने मुख्यमंत्र्यांवर टीका केली असती, तर मी काहीही बोलतो नसतो. मात्र, रिया चक्रवर्ती आरोपी आहे, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना शब्दांचा योग्य वापर केला पाहिजे, असेही पांडे यांनी म्हटले. तसेच, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रथम दर्शनी तपासापासूनच चूक केल्याचंही पांडे यांनी म्हटलंय.