थंडीच्या वातावरणात आपण सर्व घरात सुरक्षित आहोत कारण सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जीवाची पर्वा न करता आपल्या जवान देशाच्या संरक्षणासाठी उभे आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ आणि जम्मू-काश्मीरच्या अग्रीम चौकीवर सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. कडाक्याच्या थंडीतही भारतीय सैन्याचे जवान जागता पाहारा देत आहेत. यातच भारतीय जवानांचा एक जबरदस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
भारतीय सैन्याचे जवान तुफान बर्फवृष्टी होत असताना हाती राष्ट्रध्वज घेऊन एक पारंपारिक नृत्य करत असल्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे. भारतीय सैन्याचे जवान 'खुकुरी' हा पारंपारिक नृत्य प्रकार सादर करत आहेत आणि एका जवानानं राष्ट्रध्वज हाती घेतला आहे. भारतीय जवानांचा हा व्हिडिओ पाहून सर्वजण भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाला सलाम करत आहेत. ज्या ठिकाणी भारतीय सैन्याचे जवान नृत्य करताना दिसत आहेत तिथं तुफान बर्फवृष्टी आणि हाडं गोठवणारी थंडी आहे.
भारतीय सैन्यातील जवान देशाच्या संरक्षणासाठी अतिशय जबाबदारी आपली भूमिका सीमेवर पार पाडत असतात याची आपल्याला जाणीव आहेच. तापमानाचा पारा शून्यापेक्षाही आणखी खाली गेलेला असतानाही जोश काही कमी झालेला दिसत नाही. भारतीय सैन्याचे जवान कोणतंही दडपण येऊ न देता देशवासियांचं संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र सीमेवर तैनात आहेत. भारतीय सैन्य दलाला सलाम.