नवी दिल्ली : पी. चिदंबरम, डी. के. शिवकुमार यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांविरोधात तपास यंत्राणांनी कारवाई केल्यानंतर आता मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालय त्यांच्याविरोध 1984 च्या शीखविरोधी दंगल प्रकरणाची फाइल पुन्हा उघणार असल्याचे समजते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने कमलनाथ यांच्याविरोधातील 1984 च्या शिखविरोधी दंगल प्रकरणाची फाइल पुन्हा उघडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शिरोमणी अकाली दलाचे दिल्लीतील आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, याआधी 2018 मध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर कमलनाथ मुख्यमंत्री झाले. त्यावेळी 1984 च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात कमलनाथ यांचे नाव पुढे आले होते. तेव्हा भाजपाने त्यांना मुख्यमंत्री न करण्याची मागणी केली होती.
मनजिंदर सिंह सिरसा ट्विटरवरुन म्हटले आहे की, "अकाली दलासाठी एक मोठा विजय. 1984 मध्ये शिखांचा नरसंहार झाला. यात कमलनाथ यांचा कथित समावेश असल्याच्या प्रकरणाला एसआयटीने पुन्हा उघडले. गेल्या वर्षांपासून गृह मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयाने कमलनाथ यांच्याविरोधात ताज्या पुराव्यांवर विचार करुन प्रकरण नंबर 601/84 पुन्हा उघडण्याचे पत्रक जारी केले आहे."
दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात अनेक ठिकाणी शीख विरोधी दंगल उसळली होती. इंदिरा गांधी यांची हत्या करणारे दोघे आरोपी हे शीख समाजातले असल्यामुळे शीखविरोधी वातावरण तापले होते.