नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून पुरेसा निधी दिला जात नाही. केंद्र सरकार उत्तर प्रदेशच्या बाबतीत भेदभाव करीत आहे, असा आरोप करीत गुरुवारी राज्यसभेत सपाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. सभागृहाचे कामकाज त्यामुळे प्रथम तीनदा आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच सपा सदस्यांनी आरोप केला की, उत्तर प्रदेशच्याबाबतीत भेदभाव केला जात आहे. सपाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले की, याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव व मंत्री यांनी अनेकदा पत्र लिहिले की, केंद्राकडून राज्याला त्यांचा वाटा दिला जावा; पण राज्याला ही रक्कम मिळत नाही. सर्वशिक्षा अभियान, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती आणि अन्य मागासवर्गांच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, उच्चशिक्षण, रस्ते विकास योजना आदी अनेक योजना निधीअभावी ठप्प आहेत.सपाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले केंद्र सरकारने दोन दिवसांत उत्तर प्रदेशला निधी देण्याचे आश्वासन द्यावे; अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. याचवेळी सपाचे सदस्य समोरच्या रांगेत येऊन घोषणाबाजी करू लागले. सततच्या गोंधळामुळे कामकाज तीन वेळा स्थगित करण्याची वेळ उपसभापतींवर आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सपा सदस्यांचा राज्यसभेत गोंधळ
By admin | Published: August 12, 2016 3:10 AM