नवी दिल्ली - गरिबीमुळे अनेकांचे हाल होत असलेल्या असंख्य घटना आपण सातत्याने पाहत असतो. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. गरिबीचं भीषण वास्तव पाहायला मिळालं असून एका जन्मदात्या आईवर आपल्या बाळाला विकण्याची वेळ आली आहे. आईने 2 चिमुकल्यांना शहरात सोडलं तर नवजात बाळाला 5 हजारांत विकलं आहे. झारखंडच्या गुमला जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. गुमला शहरातील आंबेडकर नगरमध्ये राहणारी गुडीया देवीने गरिबीमुळे आपल्या बाळाची विक्री केली. काही दिवसांपूर्वीच तिने या बाळाला जन्म दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिजन भागातील एका कुटुंबाने 5 हजार रुपयांत नवजात बाळाला विकलं. गरीबीमुळे गुडीयाची दोन मुलं पाटणाजवळील बिहटामध्ये वीट भट्टीवर काम करतात. तिसरी मुलगी 3 वर्षांची आहे. पण आता चौथ्या बाळाला गुडीयाने विकलं. गुडीयाकडे राहण्यासाठी घर नाही. तसेच अन्न धान्य देखील नाही. परिसरातील लोकच तिला आणि तिच्या मुलीला खाण्यासाठी काहीना काही तरी आणून देत असतात. महिलेचा पती मिळेल ते काम करून पैसे कमावतो. तो कधी कधीच घरी येतो.
गुडीया देवीने दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपासून ती टीबीने आजारी आहे. परिसरातील लोकांनीच तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारानंतर काही दिवसांनी ती रुग्णालयातून अचानक पळून गेली. आंबेडकर नगरमध्ये एक भंगाराचं दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर शेडखाली गुडीया देवी आपल्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन राहते. त्यांना सरकारी सुविधा देखील मिळत नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.