ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5- सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शोमध्ये महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे आम आदमी पक्षाचे नेते आणि कवी कुमार विश्वास अडचणीत सापडले आहेत. नेते कुमार विश्वास यांच्याविरोधात दिल्लीतील डाबरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. द कपिल शर्मा शोमध्ये कुमार विश्वास यांच्यासोबत शायर राहत इंदौरी आणि शायरा शबीना अदिब सहभागी झाले होते. १ जुलै रोजी हा शो दाखविण्यात आला होता.
द कपिल शर्मा शोमध्ये कुमार विश्वास यांनी महिलांविरोधात अतिशय अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधान केल्याचं तक्रारकर्त्या महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. निवडणुकांच्या वेळी मत मागण्यासाठी प्रचार करताना नेत्यांना त्यांच्या कॉलनीमध्ये मोठ्या अडचणी येतात. ज्या मुलीसोबत तुमचे प्रेमसंबंध होते, तिच्या पतीलासुद्धा भावजी म्हणावं लागतं. भावजी मतदान करा. सामान तर तुम्ही घेऊन गेलात, असं कधीकधी बोलण्याची वेळ येते,” असं आक्षेपार्ह विधान कुमार विश्वास यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे एका महिलेने दक्षिण दिल्लीतील डाबरी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
शनिवारी मी द कपिल शर्मा शो पाहत होते, त्यावेळी कुमार विश्वास यांनी आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर माझ्या मुलीने, आई लग्नानंतर आम्हीसुद्धा सामान होणार का?, असा प्रश्न विचारला,’ असं या महिलेने तक्रारीत म्हंटलं आहे. ‘महिला वस्तू असतात का?, असा सवालदेखील संबंधित महिलेने उपस्थित केला आहे.
कुमार विश्वास याआधीही महिलांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे वादात सापडले होते. केरळमधील परिचारिकांविरोधात अपमानास्पद विधान असलेला त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.‘आधी बऱ्याचशा काळ्या पिवळ्या परिचारिका केरळहून यायच्या. त्यामुळे कोणीही नैसर्गिकपणे त्यांना सिस्टर म्हणायचं,’ असं कुमार विश्वास यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.
आणखी वाचा
"भारताचे कमकुवत पंतप्रधान", राहुल गांधींची मोदींवर टीका
शिवसेना नगरसेविकांची भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकरांना मारहाण
गर्भात असताना गोळी लागूनही बाळ जिवंत