नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या मोफत व्हॉइस आणि इंटरनेट सेवेविषयी देशाच्या अॅटर्नी जनरलचे मत ट्रायने मागविले आहे. येत्या मार्चपर्यंत देण्यात आलेली ही सेवा दूरसंचार क्षेत्रात ‘भक्षक’ स्वरूपाची असल्याचा आरोप जिओच्या स्पर्धक कंपन्यांनी केला आहे.जिओच्या या आॅफरला स्पर्धक कंपन्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ट्रायने जिओला नोटीस बजावली होती. त्यावर जिओने स्पष्टीकरण सादर केले होते. त्याचा अभ्यास ट्रायकडून सुरू आहे. १८ डिसेंबरपर्यंत जिओचे ६३ दशलक्ष ग्राहक झाले होते. मोफत सेवेमुळे कंपनीला झटपट ग्राहक मिळाले आहेत. हा प्रकार निकोप स्पर्धेला छेद देणारा असल्याचे ट्रायने आपल्या नोटिसीत म्हटले होते. जिओची मूळ योजना ५ सप्टेंबर रोजी घोषित झाली होती. तिला कंपनीने नव्या वर्षात आणखी तीन महिने मुदतवाढ दिली होती. >कनेक्टेड कार अॅप, टीव्ही आणि बरेच काहीदूरसंचार क्षेत्रात उडी घेतल्यानंतर जिओने डिजिटल मिशन अंतर्गत अनेक सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कंपनी ‘जिओफाय’ नावाचे खिशात बाळगता येणारे वायफाय राउटर आणणार आहे. त्यावर एकावेळी ३२ उपकरणे चालू शकतील.त्यानंतर येणार आहे ‘जिओ कार कनेक्ट’ नावाचे डोंगल. जिओ सीम असलेले हे डोंगल कारच्या आॅनबोर्ड डायग्नोस्टिक पोर्टमध्ये इन्सर्ट करताच कार संपूर्ण डिजिटल होईल. एक कि. मी. अंतरावरूनही कारच्या सर्व हालचाली तुम्हाला अॅपवर पाहता आणि नियंत्रित करता येतील. आॅफिसात बसून कार सुरू करता येईल. हे अॅप तुमची कार चोरीपासून वाचवील. हे उपकरण सध्या विदेशात बनविले जात आहे. त्याची निर्मिती लवकरच देशातच सुरू केली जाणार आहे.
जिओच्या आॅफरवर ट्रायने मागविले मत
By admin | Published: January 19, 2017 4:46 AM