हैदराबाद : सर्व एक्झिट पोलनी के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला असला तरी हैदराबादमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आकडे व टक्क्यांत थोडासा फरक झाला तरी टीआरएसचे सारे गणित बिघडू शकते. त्यामुळेच विजयाची खात्री व्यक्त करणारा हा पक्ष अद्याप काहीसा अस्वस्थ दिसत आहे. त्यामुळेच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी सकाळी चंद्रशेखर राव यांना भेटून बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. भाजपाही राव यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. पण राव यांनी एमआयएमला जवळ करू नये, अशी भाजपाची अट आहे. भाजपापेक्षा एमआयएमचे अधिक आमदार निवडून येतील, अशी खात्री राव यांना असल्यामुळेच त्यांनी भाजपाला धुडकारून लावले आहे. आपल्याला भाजपाचा पाठिंबा नको, असे सांगतानाच, लोकसभा निवडणुकीतही आपला पक्ष भाजपाशी आघाडी करणार नाही, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे.तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या आहे ११९. त्यामुळे बहुमतासाठी ६0 जागा मिळणे आवश्यक आहे. गेल्या निवडणुकांत टीआरएसला ६३ म्हणजेच बहुमतापेक्षा तीनच जागा जादा मिळाल्या होत्या आणि एकूण मते मिळाली होती ३४ टक्के. याउलट काँग्रेसला २१ व तेलगू देसमला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यांची बेरीज बहुमतापेक्षा कमी म्हणजे ३६ असली तरी त्या दोन्ही पक्षांना मिळून मते मिळाली होती ४0 टक्के. आता हे दोन्ही पक्ष तसेच टीजेएस व सीपीआय यांची आघाडी आहे. आता त्यांची मते एखाद-दोन टक्क्याने वाढली आणि टीआरएसची मते आहे तशीच राहिली तरी काँग्रेसप्रणित आघाडीला बहुमत मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.गेल्या निवडणुकांत चंद्रशेखर राव हिरो होते. पण चार वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने लोकांची काही प्रमाणात नाराजी आहे, असे गृहित धरले आणि त्याचा फटका बसला तर टीआरएसचे सारेच गणित बिघडू शकते. त्यामुळेच एक्झिट पोलचे निष्कर्ष काहीही असले तरी काँग्रेसला तेलंगणातही विजयाचा विश्वास दिसत आहे. त्यामुळेच टीआरएसमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. ती दूर करण्यासाठीच असदुद्दिन ओवेसी यांनी आज राव यांची भेट घेतली. या दोन्ही पक्षांना भाजपाची नव्हे, तर काँग्रेसचीच भीती आहे. तेलंगणात भाजपापेक्षा काँग्रेसच वाढण्याची शक्यता आहे, कारण भाजपाला फारशा जागा मिळणार नाहीत, असे बोलले जाते.त्यामुळे भाजपा राव यांना ‘किंग’ बनवण्यासाठी किंगमेकर बनू शकणार नाही, अशी चर्चा आहे. एमआयएमला जवळ करणार नसाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत, असे भाजपाने म्हटले आहे. एमआयएमचा पाठिंबा घेऊ नही राव यांना आमदारांची गरज लागली तर भाजपा त्यांना मदत करणार का, हा सवाल आहे. तसे झाल्यास एमआयएम व भाजपा एकत्र आल्यासारखे दिसेल.गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी...काँग्रेस, तेलगू देसम, टीजेएस यांच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊ न आम्ही आघाडी करून निवडणूक लढवली असल्याने सर्वाधिक जागा मिळाल्यास आम्हालाच सत्तास्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी केली. स्पष्ट बहुमत कोणालाच नसल्यास राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल टीआरएसला बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोव्यात तसेच घडले होते.
टीआरएसला विजयाची खात्री; काँग्रेसला यशाचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 6:13 AM