हैदराबाद - तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे गजवेल मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. तर राव यांचे पुत्र के. टी. रामाराव हेही सिरसिला मतदारसंघातून तब्बल 15,096 मतांनी आघाडीवर आहेत. रामाराव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार 5375 एवढी मते मिळाली आहेत. देशातील सर्वात तरुण राज्य असलेल्या तेलंगणात दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक होत आहे. गतवर्षी राव यांच्या टीआरएस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर, यंदाही तेलंगणात टीआरएस यांच्याच पक्षाला लोकांनी संधी दिल्याचे दिसून येत आहे.
टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांना काँग्रेस आणि तेलुगू देसम पार्टीचे आव्हान होते. तसेच भाजपनेही तेलंगणात राव यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले होते. मात्र, तेलुगू जनतेनं पुन्हा एकदा राव यांच्यावर विश्वास टाकला आहे. गजवेल मतदारसंघातून चंद्रशेखर राव विजयी होत आहेत. राव यांना काँग्रेस अन् टीडीपी आघाडीच्या वंतेरु प्रताप रेड्डी यांचे आव्हान होते. मात्र, वंतेरु प्रताप रेड्डी राव यांच्यापासून दूर आहेत. गजवेल मतदारसंघातील निकालांच्या आकडेवाडीवरुन चंद्रशेखर राव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर सिरसिला मतदारसंघातून रामाराव यांचाही विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे तेलंगणाता भाजपा अन् काँग्रेसनं केलेला विजयाचा दावा फोल ठरला असून दोन्ही पक्षांचे गणित बिघडलं आहे. दरम्यान, तेलंगणात टीआरएसने आतापर्यंत 7 जागांवर विजय मिळवला असून एमआयएम पक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे. तर टीआरएसची 86 जागांवर आघाडी असून दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसल 18 जागांवर आघाडी आहे. तर भाजपाचे केवळ 2 उमेदवार आघाडीवर आहेत.