गडवाल : तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएस ही भाजपाची बी टीम असून, एमआयएम ही सी टीम आहे. भाजपाला मदत करण्याचे कामच हे दोघे करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली. केंद्रात भाजपा सत्तेत राहावी, असाच या दोन्ही पक्षांचा प्रयत्न असून, त्या बदल्यात तेलंगणात क. चंद्रशेखर राव यांना भाजपा अभय देईल, असा आरोपही त्यांनी केला.टीआरएस आतापर्यंत केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देत होती. नोटाबंदी व जीएसटीलाही चंद्रशेखर राव यांनी पाठिंबा दिला. इतकेच नव्हे, तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांतही त्यांनी भाजपालाच मदत केली, असे सांगून आमच्या आघाडीची मते फोडण्याचेच काम या दोन्ही पक्षांतर्फे सुरू आहे. टीआरएस म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती नसून, तेलंगणा राष्ट्रीय संघ परिवार आहे, अशीही टीका राहुल गांधी यांनी कोसगी येथील प्रचार सभेत केली. के. चंद्रशेखर राव यांनी गेल्या चार वर्षांत तेलंगणाचा नव्हे, तर स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला, असा आरोप त्यांनी रंगारेड्डी जिल्ह्याच्या सभेत केला.
टीआरएस, एमआयएम भाजपाची बी व सी टीम- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:55 AM