कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज एक विचित्र घटना घडली आहे. मोठे विमानच ओव्हरब्रिजखालून नेले जात असताना अडकल्याने वाहतूक खोळंबली आहे. भारतीय पोस्ट खात्याचे हे विमान आहे. हे विमान देशांतर्गत पोस्टाची सेवा, वस्तू पोहचविण्यासाठी वापरले जात होते. मात्र, हे विमान जुने झाल्याने पोस्टाने सेवेतून मुक्त केले होते. अखेर जीर्ण होऊ लागल्याने आणि विमानउड्डाणासाठी सक्षम न राहिल्याने ते दुसरीकडे हलविण्यात येत होते. यासाठी एका ट्रकवर लादून हे विमान रस्ते मार्गे नेण्य़ात येत होते.
यावेळी दुर्गापूरच्या एका ओव्हरब्रिजखालून हा ट्रक जात असताना विमानाची उंची जास्त झाल्याने हे विमान पुलाला लागले. चालकाच्या ही बाब लक्षात न आल्याने ट्रकच अडकून बसला आहे.
काही दिवसांपूर्वीच चीनमध्येही अशीच घटना घडली होती. चीनच्या हर्बीन शहरामध्ये ट्रकवरून नेण्यात येत असलेले विमान पुलाला अडकले होते. यानंतर तज्ज्ञांना घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यांनी खूप विचार करून युक्ती शोधली होती. त्यांनी ट्रकच्या टायरची हवाच काढून टाकत विमानाची उंची कमी केली होती. या ट्रकचे टायर उंच असल्याने ही युक्ती कामी आली होती.