श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
नूर मोहम्मद डार असे या ट्रक चालकाचे नाव असून ते जरादीपुरा उरानहाल येथे राहत होते. नूर मोहम्मद डार घरी जात असताना काल संध्याकाळी आंदोलकांनी सुरक्षा रक्षकांची गाडी म्हणून त्यांच्या ट्रक दगडफेक केली. या दगडफेकीत नूर मोहम्मद डार यांच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दगडफेक करणाऱ्या एका आरोपीची ओळख पटली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी श्रीनगर येथील संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षकाच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आवाहन करणारी भित्तीपत्रके फुटीरतावाद्यांनी काही ठिकाणी लावल्याने याठिकाणी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काश्मीरमधील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात संचारबंदीसह लागू केलेले काही निर्बंध मागे घेण्यात आले होते. जागोजागी लावलेले बॅरिकेटस् काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे रसत्यावर लोकांची वर्दळ व वाहनांची ये-जा सुरू झाली होती. मात्र, राज्यातील सर्व बाजारपेठा अद्यापही बंद आहेत.