नवी दिल्ली: केंद्र सरकारने 'हिट अँड रन' (Hit And Run) कायद्यात केलेल्या (Motor Vehicles Act) बदलांविरोधात देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारला होता. या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील लोकांचे हाल झाले. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासमवेत गृह मंत्रालयात राष्ट्रीय परिवहन संघटनेची बैठक झाली. यावेळी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते म्हणाले की, नवीन कायद्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. भारतीय न्यायिक संहितेचे कलम 106/2 लागू करण्यापूर्वी आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या लोकांशी बोलू, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
यामुळे आता राष्ट्रीय परिवहन संघटनेने देशभरातील चालकांना संप मागे घेण्यास सांगितले आहे. सध्या कायद्याची अंमलबजावणी होणार नसून ज्यावेळी त्याची अंमलबजावणी होईल, त्या वेळी संघटनेशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन संघटनेला सरकारकडून देण्यात आले आहे. यानंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष मलकित सिंग बल म्हणाले की, 106 (2), ज्यामध्ये 10 वर्षांची शिक्षा आणि दंड आहे, हा कायदा अद्याप लागू झालेला नाही आणि आम्ही कायदा लागू होऊ देणार नाही. आम्ही आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. भविष्यात या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही, अशी ग्वाही आम्ही सर्व वाहन चालकांना देतो. यावेली त्यांनी सर्व चालकांना आपला संप मागे घेण्याचे आवाहन केले.