भोपाळ - मध्य प्रदेशमधील इंदूर-भोपाळ महामार्गावर झागरिया बायपासजवळ एक भरधाव ट्रक कारवर उलटून झालेल्या अपघातात पती पत्नीचा करुण मृत्यू झाला. शेतीचे सामान घेऊन जात असलेला हा ट्रक एवढा अवजड होता की त्याखाली दबून कार भुईसपाट झाली आणि त्यातून प्रवास करत असलेल्या पती-पत्नींचा तडफडून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, खूप प्रयत्नांनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. (truck fell on the car, the car was crushed under the heavy truck, the husband and wife had a tragic end)
या अपघाताबाबत सीहोरचे एसपी एसएस चौहान यांनी सांगितले की, एक कार (एमपी ३७, सी ६२७०) ही भोपाळकडे जात होती. ज्यामध्ये दोन जण होते. तर ट्रक इंदूरच्या दिशेने येत होता. या ट्रकाल झागडियाच्या बाजूला वळायचे होते. मात्र ट्रक चालकाने वळताना ब्रेक लावला आणि यादरम्यान, कार ट्रकवर आदळली.
ट्रकमध्ये अधिक वजन असल्याने टक्कर होताच ट्रक पलटला आणि कार त्याच्याखाली दबली व पूर्णपणे भुईसपाट झाली. या अपघातात राजेंद्र रैना आणि त्यांची पत्नी विभा रैना यांचा मृत्यू झाला. कारवरून ट्रक हटवण्यासाठी क्रेनला बोलावण्यात आले. मात्र ट्रकमध्ये वजन अधिक असल्याने ट्रक उचलणे क्रेनला शक्य झाले नाही.
त्यानंतर अजून दोन क्रेन बोलावण्यात आल्या. तिन्ही क्रेन आणि एका बुलडोझरच्या मदतीने कारवर उलटलेल्या ट्रकला हटवण्यात आले. त्यानंतर पूर्णपणे दबलेल्या कारमध्ये अडकून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मग हे मृतदेह बाहेर काढले आहेत तसेच पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.