PM Modi Attack On Congress: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरपूस समाचार घेतला. खोटी आश्वासने देणे सोपे आहे, पण त्यांची योग्य अंमलबजावणी करणे अवघड किंवा अशक्य आहे, हे काँग्रेस पक्षाला चांगलेच समजले असेल, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.
पीएम मोदींचा हल्लाबोलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (01 नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कर्नाटक सरकारला दिलेल्या सूचनेवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, आता काँग्रेसचा पर्दाफाश झाला आहे. ते आश्वासने देत राहतात, परंतु त्यांना माहित आहे की, ते ते कधीही पूर्ण करू शकणार नाहीत. आता लोकांसमोर काँग्रेसचे सत्य उघड झाले आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, आज काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणाकडे पाहा. विकासाचा वेग आणि आर्थिक परिस्थिती खराब होत चालली आहे. त्यांच्या तथाकथित हमी अपूर्ण राहिल्या आहेत. हा राज्यांतील जनतेचा घोर विश्वासघात आहे.
पंतप्रधान मोदींनी सांगितले काँग्रेस कशी काम करते?पीएम मोदी इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले, कर्नाटकमधील काँग्रेस पक्ष विकासाची कामे करण्याऐवजी पक्षांतर्गत राजकारण आणि लुटमारीत व्यस्त आहे. एवढेच नाही तर सध्याच्या योजनाही मागे घेणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. देशातील जनतेला खोट्या आश्वासनांच्या काँग्रेस पुरस्कृत संस्कृतीपासून सावध राहावे लागेल. हरयाणातील जनतेने त्यांचे खोटे कसे नाकारले आणि स्थिर, कृतीशील सरकारला प्राधान्य दिले, हे आपण अलीकडेच पाहिले, अशी बोचरी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली.
मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील आपल्याच काँग्रेस सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. सध्या कर्नाटकात ‘शक्ती योजने’वरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. अनेक महिलांनी बसचे भाडे भरण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे सरकार या योजनेचा पुनर्विचार करेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केले. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. यावरुन खर्गे यांनीही कर्नाटक राज्य सरकारवर सडकून टीका केली. ‘जी आश्वासने पूर्ण करता येत नाहीत किंवा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत राज्यावर आर्थिक बोजा पडतो, अशी कोणतीही आश्वासने निवडणुकीच्या काळात देऊ नयेत,’ असे खर्गे म्हणाले.