ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.17 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मे महिन्यात भेट होण्याची शक्यता असून दोन्ही देशातील सरकार त्यादृष्टीने तयारी करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात वॉशिंग्टनला जाण्याची शक्यता आहे. हॅमबर्ग येथे पार पडणा-या जी-20 परिषदेतही मोदी आणि ट्रम्प यांना भेटण्याची संधी आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच एक द्विपक्षीय बैठक पार पडावी यासाठी दोन्ही सरकार आग्रही आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मोदींनी फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं होतं. काही आठवड्यांपुर्वी पुन्हा एकदा दोघांमध्ये दोन्ही देशांसाठी महत्वाच्या मुद्यांवर फोनवरुन बातचीत झाली होती. यावेळी सुरक्षा, आर्थिक आणि व्यापा-याच्या मुद्यावर दोघांनी बातचीत केल्याचं कळलं होतं.
अमेरिकेचे सुरक्षा सचिव जेम्स मॅटिस यांनी काही दिवसांपुर्वी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी बातचीत केली होती. दोघांमध्ये झालेलं हे पहिलंच संभाषण होतं. तर राज्यसचिन रेक्स टिल्लरसन यांनी सुषमा स्वराज यांच्याशी संवाद साधला होता. ट्रम्प यांनी सुत्रे आपल्या हाती घेण्यापुर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लायन, ज्यांनी नुकताच राजीनामा दिला, यांनी वॉशिंग्टनमध्ये अजित डोवल यांची भेट घेतली होती.