नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्पअहमदाबादला भेट देणार असून या पार्श्वभूमीवर याठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, 'अहमदाबाद विमानतळापासून ते स्टेडियमपर्यंत 70 लाख लोक माझे स्वागत करणार आहेत.' यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड टॅम्प काय भगवान आहेत? जे 70 लाख लोक स्वागत करतील. ते आपले हित साधण्यासाठी येत आहेत, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, काँग्रेसने हिंदू दहशतवादाची खोटी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केला होता. याला उत्तर देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, "हिंदू दहशतवाद हा शब्द तयार होण्यामागे एक वेगळी पार्श्वभूमी होती, मक्का मशिदीत स्फोट झाले होते आणि प्रज्ञा ठाकूरसह अनेक जणांना अटक करण्यात आली होती. दहशतवादी सतत फसविण्याची युक्ती करतात. ते आपली वास्तविक ओळख दाखवून हल्ला करू शकत नाहीत."
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा व्हाईट हाऊसने जाहीर केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यात भारत-अमेरिकेदरम्यान काही करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हॉस्टनमध्ये 'हाउडी मोदी' कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर आले होते. त्यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणाही केली होती.