वॉशिंग्टन - भारताने जम्मू काश्मीरला विदेश दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून भारताला सातत्याने पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय संबंध तसेच इतर स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी संवाद साधत त्यांना कठोर शब्दात फटकारले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी रात्री चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांबाबत संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक शांततेचा मुद्दा ट्रम्प यांच्यासमोर उपस्थित केला. तसेच काही नेत्यांकडून भारताविरोधात सुरू असलेली प्रक्षोभक वक्तव्ये प्रादेशिक शांततेसाठी बाधा ठरत आहेत, असे सुतोवाच मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता केला. मोदींशी चर्चा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांच्यातही चर्चा झाली. यावेळी इम्रान खान यांनीसुद्धा प्रादेशिक प्रश्न उपस्थित केले. मात्र भारतासोबतच्या संबंधांमध्ये शांतता कायम ठेवा, असे ट्रम्प यांनी त्यांना बजावले. तसेच कुठल्याही प्रकारची कारवाई आणि आक्रमक वक्तव्ये आणि आक्रमक भूमिकेपासून दूर राहा, असेही ट्रम्प यांनी इम्रान खान यांना बजावले. मोदी आणि इम्रान खान यांच्याशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटरवरून त्याची माहिती दिली. ''मी माझे दोन चांगले मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये व्यापार, सामरिक भागीदारी आणि जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबतही चर्चा झाली. तेथील परिस्थिती संवेदनशील आहे. मात्र चर्चा चांगली झाली.''
काश्मीर प्रश्नावरून ट्रम्प यांची मोदींशी चर्चा, इम्रान खानना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 1:18 PM