हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी केसीआर सरकार बरखास्त झाल्यानंतर म्हणजे ६ सप्टेंबरपासूनच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. आता प्रत्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. टीआरएसने पुन्हा सत्तेत येण्यासाठी मोर्चेबांधणी केली असून, काँग्रेस-टीडीपी आघाडीनेदेखील सर्व ताकद पणाला लावली आहे.
आठ महिने आधीच के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी सरकार बरखास्त केल्याने ११९ जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीने १०७ उमेदवारांची नावे निश्चित केली असून, त्यातील १०५ जणांची नावे तर विधानसभा बरखास्त केल्यानंतर काही मिनिटांतच जाहीर करण्यात आली. त्यांनी तेव्हापासूनच प्रचार सुरु केला.भाजप स्वतंत्र लढणार आहे, तर काँग्रेसने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देशमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू, प्रा.कोडनदरम यांची तेलंगणा जन समिती व सीपीआय यांच्यासोबत आघाडी केली आहे. गेल्या आठवड्यात मित्रपक्षांना किती जागा दिल्या जातील, हे स्पष्ट केले. काँग्रेस ९३ जागा लढणार असून, घटक पक्षांसाठी २५ जागा सोडण्यात येणार आहेत. त्यात १४ जागा तेलगू देसम, ८ जागा टीजेएस व ३ जागा सीपीआयला मिळाल्या आहेत. गेल्यावेळी भाजपसोबत असताना टीडीपीने १५ जागांवर विजय मिळवला होता.येत्या काही दिवसांत टीआरएस व काँग्रेस यांच्या प्रचाराची सुरुवात होणार असून, मुख्य लढती त्यांच्यातच होतील. काही ठिकाणी ओवैसी यांचा एमआयएम प्रबळ असून, तिथे मात्र तिरंगी वा चौरंगी लढती अपेक्षित आहेत. केसीआर सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, त्यांचे कुटुंबच भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले आहे, आदी मुद्दे प्रचारात दिसत आहे.
हरयाणा, आसाम, त्रिपुरा व महाराष्ट्राप्रमाणे तेलंगणाची जनताही आम्हाला चांगला प्रतिसाद देईल, असे भाजपाच्या कृष्णा सागर राव यांनी सांगितले. तेलंगणा जन समितीचे अध्यक्ष प्रा. कोडनदरम यांनी टीआरएस सरकारवर टीकास्त्र सोडले. केसीआर सरकारमधील मंत्रीपॉवरलेस ठरले आहेत. संपूर्ण सत्ता चंद्रशेखर राव यांच्याभोवती केंद्रित झाल्याने विकास झाला नाही. हे जनतेने ओळखले आहे, त्यामुळे निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा दावा प्रा. कोडनदरम यांनी केला आहे.तेलंगणात गुलाबी रंगाचा धुमाकूळच्तेलंगणात सध्या सर्वत्र गुलाबी रंग पसरलेला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचा झेंडा गुलाबी आहे, त्या पक्षाचे कार्यकर्ते डोक्याला रुमाल बांधत आहेत तोही गुलाबी, अनेक जण गुलाबीच उपरणे घेत आहेत आणि अनेक महिला कार्यकर्त्या गुलाबी रंगाची साडी वा ड्रेस परिधान करताना दिसत आहेत.च्मिरवणुकांमध्येही गुलाबी रंगांचीच उधळण केली जाते आणि कित्येकदा तर गुलाबाचे हारच नेत्यांना घातले जात आहेत. मतदान यंत्रांसोबतची पावतीही गुलाबी असणार आहे. काँग्रेसने गुलाबी रंगाची पावती वा मतपत्रिका यांना विरोध केला आहे. त्या रंगातून तेलंगणा राष्ट्र समितीचा प्रचार होईल. त्यामुळे तो रंग बदलावा, अशी मागणी काँग्रेस करीत आहे.