नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात जेएनयू व रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी आवेशात सरकारची बाजू मांडणाऱ्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींनी महिषासुराचा वध व देवी दुर्गा यांच्यासंबंधी केलेल्या वादग्रस्त विधानांवर विरोधकांनी जोरदार आक्षेप नोंदवल्यामुळे सभागृहात शुक्रवारी गदारोळ झाला. इराणींनी या विधानांबाबत माफी मागावी, अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा राज्यसभेत काँग्रेस व डाव्या पक्षाच्या सदस्यांनी घेतला. त्यावर, मी स्वत: दुर्गामातेची पूजा करते, अत्यंत व्यथित अंत:करणाने हा मजकूर मी वाचून दाखवला. महिषासुर वधाबाबत सभागृहात वाचून दाखवलेला कागद सरकारी दस्तऐवज नाही तर जेएनयू परिसरात वाटलेले पत्रक आहे, असा खुलासा इराणी यांनी केला.शून्य प्रहरात इराणींच्या विधानांवर आक्षेप नोंदवीत काँग्रेसचे आनंद शर्मा म्हणाले, सरकार तुमचे आहे, दुर्गामातेसंबंधी अश्लील व अपमानजनक विधाने करणाऱ्यांना अवश्य अटक करा, मात्र देवी देवतांबाबत अपमानजनक विधानांचा उल्लेख मंत्री या नात्याने सभागृहात तुम्ही करण्याचे कारणच नाही. आपल्या कृतीबद्दल तुम्ही माफी मागायला हवी. कामकाजातून इराणींची संबंधित विधाने काढून टाकण्याचीही शर्मांनी मागणी केली.राज्यसभेत गुरुवारी जे हँडबील इराणींनी वाचून दाखवले, त्याचा आशय जेएनयू परिसरात महिषासुराला दलितांचा राजा ठरवून, दुर्गा मातेने केलेल्या त्याच्या हत्येचे काही दलित विद्यार्थ्यांतर्फे महिमामंडन केले जाते. दुर्गा पूजेच्या वेळी महिषासुराला शहीद ठरवून त्याची पूजाही केली जाते. तशी पोस्टर्स विद्यापीठात लावले जातात, असा होता. विद्यार्थ्यांच्या या मानसिकतेला काय म्हणावे, असा सवाल त्यावर इराणींनी उपस्थित केला होता. त्यावर जोरदार आक्षेप घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी म्हणाले, धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्यासाठी इराणींनी जाणीवपूर्वक सभागृहात हे पत्रक वाचून दाखवल होते. अशी अनेक वादग्रस्त पत्रके रोज देशभर वाटली जातात. प्रत्येक पत्रक कधीही सभागृहात वाचून दाखवले जात नाही. (विशेष प्रतिनिधी)
इराणींच्या वादग्रस्त विधानांवरून रणकंदन
By admin | Published: February 27, 2016 1:51 AM