तिरुवनंतपुरम - केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिरामध्ये दोन महिलांनी प्रवेश करुन इतिहास घडवला आहे. या घटनेचे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी स्वागत केले आहे. हा विजय समानतेचा असल्याची प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय देत सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशासाठी परवानगी दिली होती. यानंतर, 16 नोव्हेंबर 2018 रोजी सबरीमाला मंदिरात प्रार्थना करण्यासाठी देसाई अन्य काही महिलांसहीत पोहोचल्या होत्या. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना कोची विमानतळावरच अडवले होते.
(Video: इतिहास घडला, अखेर शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला)
(चार तृतीयपंथीयांनी घेतले शबरीमालात अय्यपांचे दर्शन)
भगवान अयप्पाच्या मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याच्या घटनेवर तृप्ती देसाई यांनी म्हटले की, ''आमच्या आंदोलनाचे एक मोठे यश आहे. हा समानतेचा विजय आहे. महिलांसाठी नवीन वर्षातील ही चांगली सुरुवात आहे. शिवाय, सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाला विरोध करणाऱ्यांचे आंदोलन अपयशी ठरले आहे. अयप्पा मंदिरात प्रार्थना करण्यासाठी सर्व महिलांना प्रवेश दिला गेला पाहिजे. दरम्यान, काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपण 20 जानेवारीपूर्वी मंदिराचे दर्शन घेऊ शकणार नसल्याचंही देसाई यांनी सांगितले. 20 जानेवारीला मंदिराचे द्वार बंद करण्यात येणार आहे. मात्र मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात आल्यानंतर तेथे जाणार असल्याचं देसाईंनी स्पष्ट केले. महिलांनी घडवला इतिहास दरम्यान, बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी सबरीमाला मंदिरात प्रवेश करुन दर्शन घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या महिलांनी काळे कपडे घातले होते आणि त्याचे चेहरादेखील झाकलेला होता. कनकदुर्गा (वय 44 वर्ष) आणि बिंदू (वय 42 वर्ष) अशी या महिलांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. या महिला पोलिसांसोबत मंदिरात गेल्या होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती उघड करण्यात आली नव्हती, अशी माहिती या महिलांनी स्थानिक वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना दिली. तर दुसरीकडे या महिलांनी प्रवेश केल्यामुळे मंदिर समितीकडून मंदिरात शुद्धिकरण करण्यात आल्याची संतापजनक माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान, या माहितीस दुजोरा देत मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी सांगितले की, दोन महिला सबरीमाला मंदिरात दाखल झाल्या होत्या, ही बाब सत्य आहे.