ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 28 - 2002 गुजरात दंगलीचा चेहरा बनलेले अशोक मोची आणि कुतुबुद्दीन अन्सारी दोघांचाही दंगलींशी अजिबात संबंध नाही. डोक्यावर भगवा कपडा बांधून हातात रॉड घेतलेले अशोक आणि दुसरीकडे मदतीची याचना करत असहाय्य परिस्थितीत हात जोडणारे अन्सारी गुजरात दंगलीचा चेहरा बनले होते. मात्र सरकारी माहितीनुसार ना अशोक आरोपी आहेत, ना अन्सारी पीडित आहेत.
गुजरातमध्ये 2002 रोजी जेव्हा दंगल भडकली होती, तेव्हा शाहपूर परिसरात अशोक यांचा चेहरा कॅमे-यात कैद झाला होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये अशोक यांचा फोटो प्रसिद्द झाला होता. अशोक यांचा हा फोटो मुस्लिमांच्या विरोधात असलेल्या द्वेषाचा चेहराच बनला होता. गोध्रा स्थानकात उभ्या असलेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 कोचला काही समाजकंटकांनी आग लावली होती, ज्यामध्ये अयोध्याहून परतणा-या कारसेवकांसोबत 59 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर दंगल भडकली होती.
42 वर्षीय अशोक सांगतात की, 'मी चुकीच्या ठिकाणी हावभाव दिले. मला फोटोसाठी अशी पोझ देण्यासाठी सांगण्यात आलं होतं. तिथे सुरु असलेल्या हिंसाचाराशी माझा काही संबंध नव्हता'. कोणत्याही दंगलीत आरोपी नसतानाही अशोक मात्र दंगलीचा चेहरा बनून राहिले.
तर दुसरीकडे व्यवसायाने शिंपी असलेले 43 वर्षीय अन्सारी जेव्हा रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांकडे रखिअल परिसरातील आपल्या कुटुंबाला वाचवण्याची याचना करत होते, तेव्हा त्यांचा फोटो काढण्यात आला होता. त्यांचं कुटुंब सुरक्षित राहिलं, मात्र त्यांचा हा फोटो पीडित मुसलमानांचा चेहरा बनला. पश्चिम बंगाल सरकारने त्यांना कोलकातात येऊन राहण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र अन्सारी 2005 मध्ये अहमादाबादमध्ये परतले आणि तिथेच आपलं छोटंसं दुकान सुरु केलं.
गुजरातमध्ये परतल्यानंतर अन्सारी यांनी दंगलीत नुकसान झालेल्या संपत्तीसाठी अधिका-यांकडे चकरा मारल्या. मात्र भाड्याच्या घरात राहत असल्याने सरकारकडे त्यांच्या संपत्तीच्या नुकसानीची काहिच माहिती नव्हती. अन्सारी यांच्या फोटोचा अनेक ठिकाणी दुरुपयोग करण्यात आला. अहमदाबादमध्ये 2008 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनने चुकीच्या पद्धतीने या फोटोचा वापर करुन घेतला होता.